June 24, 2011

स्वातंत्र्यदेवतेची विनवणी



बरेच दिवसांनी परत ही कविता वाचनात आली. कुसुमाग्रजांनी १९९६ साली ही कविता लिहिली होती. आजच्या समाजाचे वर्णन यात आहे आणि स्वातंत्र्यदेवता जनतेला उद्देशून मांडलेली ही व्यथा आहे. तुम्ही नक्की वाचा आणि इतरांनाही वाचायला द्या.  

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका। 
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका॥ 

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे। 
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरू नका॥ 

अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालु नका। 
अंध प्रथांच्या कुजट कोटरी, दिवाभितासम दडू नका॥ 

जुनाट पाने गळुन पालवी नवी फुटे हे ध्यानि धरा। 
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका॥ 

वेतन खाउन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे। 
करतिल दुसरे बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका॥ 

जनसेवेस्तव असे कचेरी ती डावंूÀची नसे गुहा। 

मेजाखालुन मेजावरतुन द्रव्य कुणाचे लुटू नका॥ 

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना। 
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाउ नका॥ 

सत्ता तारक सुधा असे पण सुराहि मादक सहज बने । 
करिन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेउ नका॥ 

प्रकाश पेरा अपुल्या भक्ती दिवा दिव्याने पेटतसे। 
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकु नका॥ 

पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा। 
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकु नका॥ 

गोरगरीबा छळू नका। 
पिंड फुकाचे गिळू नका। 
गुणीजनांवर जळू नका। 

उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका। 
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका॥ 

पर भाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी। 
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका॥ 

भाषा मरता देशहि मरतो संस्कृतिचाही दिवा विझे। 
गुलाम भाषिक होउनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका॥ 

कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणु नका। 
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडु नका॥ 

पुत्र पशूसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया। 
पर वित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडु नका॥ 

स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे। 
सदन आपुले करा सुशोभित दुसर्‍याचे पण जाळु नका॥ 

तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी। 
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका॥ 

सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामध्ये धरा। 
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालुन पळू नका॥ 

करा कायदे परंतु हटवा जहर जातिचे मनातुनी। 
एकपणाच्या मारुन बाता ऐन घडीला चळू नका॥ 

समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका। 
दासी म्हणुनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका॥ 

नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा। 
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका॥ 

माणूस म्हणजे पशू नसे। 
हे ज्याच्या हृदयात ठसे। 
नर नारायण तोच असे। 

लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरु नका। 
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका॥ 
(
प्रथम प्रकाशन 'सकाळ' दिवाळी, १९९६)

No comments:

Post a Comment